Browsing: सांगली
News of Sangli City
मोहित्याचे वडगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम सायंकाळी सात वाजताच मंदिरावरील भोंगा ( सायरन) वाजतो, घरातील टी.व्ही. बंद होतात, सगळे मोबाईल स्वीच ऑफ होतात, महिला स्वयंपाकास लागतात, मुलं पटापट अभ्यासला बसतात, बुजुर्गांचा कट्यावर संवाद रंगतो, तब्बल दीड तास मुलांचा शांत वातावरणात अभ्यास सुरू राहतो…. ही कथा आहे सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव या गावची. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्शवत ठरत आहे. कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव साधारणता साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव. गावात दोन शाळा. साधारणता साडेचारशेपेक्षा अधिक मुलं. करोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल आले. करोना गेला पण मोबाईल हातातच राहिला. बाहेर पडायचं नाही म्हणून पालकांना टीव्ही बघण्याची सवय लागलेली. ती कायम राहिली. त्यामुळे संध्याकाळ झाली की घरात टी.व्ही. सुरू आणि मुलांच्या हातात मोबाईल. यातून अभ्यास करण्याची सवयच कमी झाली. शिक्षकांनी ही सवय मोडण्याचा थोडा प्रयत्न केला पण त्यामध्ये अपयश आले. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंच विजय मोहिते यांनी दीड तास फक्त अभ्यासाचा हा नवा उपक्रम सुरू केला आहे. तसा हा उपक्रम सहजासहजी सुरू होणे कठीण. सरपंचानी प्रथम ग्रामसभा घेतली, तिथे हा उपक्रम मांडला. पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हार न मानता त्यांनी पुन्हा फक्त महिलांची आमसभा घेतली. ‘टी.व्ही.वरील आभासी मालिका महत्त्वाच्या की तुमच्या मुलांचं भविष्य? हे तुम्हीच ठरवा’ असे सांगून त्यांना भावनिक साद घातली. महिलांनी प्रतिसाद दिला आणि दीड तास घरातील मोबाईल, टी.व्ही., रेडिओ सर्व काही बंद करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. आता महिना उलटून गेला आहे. रोज संध्याकाळी सात वाजता गावातील मंदिरावर उभारलेला भोंगा वाजतो. तातडीने घरातील टी.व्ही., मोबाईल बंद होतात. मुलं अभ्यासाला बसतात. महिला स्वयंपाक घरात मग्न होतात. पुरुष मंडळींचाकट्ट्यावर सुसंवादाचा फड रंगतो. यामुळे गावातील एकूण वातावरणच वेगळं झालं आहे. साडेआठ वाजता पुन्हा भोंगा वाजला की सारं काही पुन्हा सुरळीत सुरू होते. प्रत्येक घरात याची अंमलबजावणी होते की नाही यासाठी अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबरच प्रत्येक वार्डात नेमलेल्या समितीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे रोज गावात फेरफटका मारतात. शंभर टक्के प्रतिसाद या उपक्रमाला मिळत असल्याने सध्या गावातील वातावरण अभ्यासमय झाले आहे. हे खरोखरच होते की नाही हे पाहण्यासाठी अलीकडे आसपासच्या गावातील लोक येऊन पाहत आहेत. याचा आदर्श आता राज्यातील सर्वच गावांनी घेतला तर नवी पिढी चांगली होण्यास नक्कीच मदत होणार आहे…