इचलकरंजी /प्रतिनिधी
महानगरपालिकेचा दर्जा असणाऱ्या इचलकरंजी शहराला हक्काच्या पाणी योजनेसाठी झगडावे लागते ही शरमेची बाब आहे. नेतेमंडळींनी पाणी प्रश्नाचे राजकारण करून पाणी प्रश्नाची अक्षम्य हेळसांड चालवली आहे. येत्या आठ दिवसात पाणीप्रश्नी ठोस कार्यवाही झाली नाही तर, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा इचलकरंजी नागरिक मंचने आज काढण्यात आलेल्या मूक मोर्चा द्वारे दिला.
चार वर्षांपूर्वी इचलकरंजी शहरास मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेबाबत गेल्या १४ महिन्यांपासून इचलकरंजीकर आंदोलने करत आहेत.या योजनेबाबत ८ दिवसांत कारवाई झाली नाही तर इचलकरंजीकर नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा इनाम च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. प्रांताधिकारी यांनी मूक मोर्चा च्या शिष्टमंडळाकडून हे निवेदन स्वीकारले.
इचलकरंजी शहरास मंजूर असलेली सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरिता वेगवेगळी आंदोलने होत असताना गतिमान शासन उदासीन का आहे?
एका कागल मतदार संघाच्या आमदारकीसाठी आपण आमच्या ४ लाख लोकसंख्येच्या नागरिकांचे पाणी का पळवत आहात?वस्त्रोद्योगाचे मँचेस्टर असणाऱ्या आणि लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या इचलकरंजी शहरास पाणी देण्याबाबत आपण उदासीन का आहात?एकीकडे रक्तपाताची भाषा करणारे,इचलकरंजी शहराची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे मोकाट आहेत. पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर आपण राजकीय दबावातून गुन्हे नोंद करत आहात, हे कितपत योग्य आहे?असे प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आले.
इचलकरंजी शहरास पाणी न देणाऱ्या व पाणी मागणाऱ्यांवर गुन्हे नोंद करणाऱ्या शासनाचा मूक मोर्चाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला.
इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या योजनेची अंमलबजावणी अत्यंत तातडीने करावी अन्यथा आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल. आठ दिवसात जर योजनेबाबत कार्यवाही न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत त्याची जोरदार जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी व अभिजित पटवा यांनी माणसाला दरडोई १३५ लिटर पाणी रोज देणे शासनाचे कर्तव्य असल्याची आठवण प्रांताना करून दिली.
मोर्चात उमेश पाटील,मीना कासार,रूपाली माळी,कल्पना माळी,राजू कोन्नूर,अमित बियाणी,संजय डाके,अमोल ढवळे,रवींद्र भंडारी,विद्यासागर चराटे,राजू आरगे,संजय डाके,शितल मगदूम,अमोल मोरे,,राम आडकी,ध्रुवती दळवाई,जतीन पोतदार,डॉ.सुप्रिया माने,अरुण बांगड,अमित पटवा,हर्षल बोरा,उदयसिंह निंबाळकर,राजु पारीक,घनश्याम भुतडा,सुहास पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चास मदन कारंडे,रणजित जाधव,प्रताप होगाडे,राहुल खंजीरे,राहुल सातपुते,विनय महाजन,शशांक बावचकर,सागर चाळके,विकास चौगुले,सतीश मुळीक, राजु बोंद्रे, प्रकाश मोरबाळे,रावसाहेब निर्मळे, कृष्णा कारंडे,यांच्यासह प्रिंटिंग प्रेस असोसिएशन,फॅब्रिकेशन असोसिएशन,कॉम्प्युटर असोसिएशन,जागृती यंत्रमागधारक संघटना,श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ,इचलकरंजी,इचलकरंजी किराणा असोसिएशन,इचल इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, इचलकरंजी डेव्हलपमेंट फोरम,अँनॉन फ्रेंड्स सर्कल यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
मतदानावर बहिष्कार का?
➖➖➖➖➖➖➖
मतदानावर बहिष्कार टाकणे योग्य नाही, असे मत प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांनी व्यक्त केले. तथापि दरडोई दररोज १३५ लिटर पाणी देणे आवश्यक असल्याचे इनामने ठासून सांगितले.
इचलकरंजी नागरिक मंचने गेल्या १२ वर्षापासून जागरूक नागरिक घडवण्याचे काम करते,आजपर्यत यादरम्यान जेवढ्या निवडणूका झाल्या त्यावेळी समाजवादी प्रबोधिनीसहित इतर समविचारी संघटनांसोबत इनामने स्वखर्चाने मतदान जागृती मोहिमा राबवल्या आहेत.हजारो पत्रके वाटली आहेत.असे असतानाही शासन गेल्या २० वर्षांपासून पाणीप्रश्नी दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे या निर्णयापर्यत यावे लागत असल्याचे इनामने स्पष्ट केले. यावर इनाम ठाम असल्याचे सांगत हा प्रसंग टाळायचा असल्यास त्वरित योजनेबाबात निर्णय घ्यावा, असा खणखणीत इशारा दिला. संविधान राष्ट्रीय कर्तव्य असले तरी संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बोधवचनानुसार पुढील पिढीचा जीवन मार्ग सुखकर करणे याला अनुसरून भविष्यात पाण्याची परिस्थिती भीषण होऊ नये म्हणूनच उपाययोजनेसाठी आम्ही मतदानावर बहिष्काराच्या कटू निर्णयपर्यत आल्याचे अभिजित पटवा यांनी स्पष्ट केले


