Browsing: Uncategorized
८० हजारांची लाच स्वीकारताना दोन बडे अधिकारी जाळ्यात लाचलुचपतची कोल्हापुरात धडाकेबाज कामगिरी इचलकरंजी: जिल्हा परिषदेकडील १९ केंद्र शाळांना पुरवलेल्या गणवेशाचे…
महाराष्ट्र ही आमची मायभूमी. या राज्यावर आमचं नितांत प्रेम आहे. खरं तर, ही आमची जन्म आणि कर्मभूमी आहे. आमची नाळ या मातीशी घट्ट जुळलेली आहे. पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतानाही आमच्या भागात पायाभूत सुविधा नाहीत. दोन तीन पिढ्यांनी पाण्यासाठी टाहो फोडला पण मायबाप सरकारला पाझर फुटला नाही. तरुणांना रोजगार निर्मिती नाही. शेतीसाठी मुबलक पाणी नाही. महिला सक्षमीकरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही. याउलट शेजारच्या राज्यात पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य या सर्व सुविधा चांगल्या मिळतात. आम्हाला मात्र, आमच्याच सरकारसोबत लढा द्यावा लागत आहे. सात दशकं संघर्ष करूनही मायबाप सरकार आमच्याकडं पाहत नाही. राज्यकर्ते बदलत गेले, सरकारची आश्वासने देण्याची भूमिका मात्र बदलली नाही. यामुळे भली मोठी आश्वासनं आणि कोटींच्या पॅकेजच्या बाता या पलीकडे पदरात काही पडलं नाही. पण आता सारं सहन होण्यापलिकडं गेलं आहे. आम्ही निक्षून सांगतो, आम्हाला महाराष्ट्र सोडायची हौस नाही, पण अगोदर सुविधा द्या. नाही तर आमच्यापुढं कर्नाटक, तेलगंणामध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. लढाई पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आहे…. ही संयुक्त आणि प्रातिनिधीक भूमिका आहे जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुका आणि नांदेड जिल्ह्यातील ९८ गावातील ग्रामस्थांची. गावे वेगवेगळी पण साऱ्यांची भावना एकच. शेत जमिनीला पाणी द्या ! भागाला न्याय द्या !! सीमाभागातील ८४५ गावं महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. सीमावासियांचा लढा मोठा. चिकाटी दांडगी. संघर्षासाठी लाठी काट्या खाल्ल्या. तुरुंगवास भोगला. संयुक्त महाराष्ट्राचा नारा बुलंद आहे. ” रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे’ हा दुर्दम्य आशावाद सीमालढयाचे स्फुल्लिंग ठरत आहे. कानडी अत्याचाराने सीमाभागातील लोकांचा तेथे श्वास कोंडल्याची वस्तुस्थिती असताना दुसरीकडं आपल्याच राज्यातील अनेक गावांनी चलो कर्नाटक, चलो तेलंगणा असा नारा दिला आहे. या गावांचा राग सरकारवर आहे. राज्याची स्थापना होऊन साठ वर्षे झाली, पण साध्या-साध्या सुविधा मिळत नाहीत. यामुळे त्यांचा संताप वाढत आहे. वर्षानुवर्षे आंदोलन करूनही न्याय मिळत नाही ही भावना अस्वस्थ करणारी आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४५, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर, धर्माबाद, बिलोलीसह अनेक तालुक्यातील ९८ गावांनी महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे. खरं तर, हे सारे महाराष्ट्रप्रेमी आहेत. त्यांची मायभूमी महाराष्ट्राच आहे. ” पण सरकार दरबारी मागण्यांच मान्य होत नसल्याने नाइलाज झाला आहे. आमच्या इशाऱ्याने तरी राज्य सरकारला जाग यावी हीच इच्छा आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही,” म्हणून या बांधवांनी आता सरकारला कोंडित पडकल्याची भूमिका भागातील जनतेची आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत, आतापर्यंत आश्वासनापलिकडं काहींच मिळालं नसल्याने त्यांना आता टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. पाणी द्या पाणी.. जतची हाक जत हा तसा कायम दुष्काळी तालुका. सव्वाशे गावांचा समावेश असलेल्या या तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्यासाठी म्हैशाळ योजनेची घोषणा झाली. पंचवीस वर्षे उलटून गेली, अजूनही या सर्व गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. जिथे पोहोचले तिथे केवळ पाईपलाईनच. प्रत्यक्ष पाणी नाही. पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून या तालुक्यातील जनता सरकारच्या नावानं टाहो फोडत आहे. ओरडून ओरडून घशाला कोरड पडली, पण सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही ही या भागातील लोकांची कैफीयत. म्हैशाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात फिरवणार, महापुराचे जादा पाणी दुष्काळी भागात देणार अशी घोषणाबाजी करत अनेक पक्ष आणि नेत्यांनी मते घेतली. सत्तेवर आले, पण पुढे काहीच झाले नाही. याचा राग जतकरांना आहे. योजना सहज शक्य असतानाही इच्छाशक्ती अभावी ती रखडली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तुबची- बबलेश्वर योजनेतून पाणी सोडत महाराष्ट्राला डिवचल्यानंतर आपले सरकार जागे झाले. आता दोन हजार कोटींची योजना जाहीर केली. ती पूर्ण व्हायला किती वर्षे लागतील माहीत नाही. तालुक्यातील ४५ गावांना पाणी देण्यासाठी कर्नाटकातून तुबची-बबलेश्वर योजनेद्वारे पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. चांगला पाऊस झाल्याने अतिरिक्त पाणी आहे म्हणून गेली चार वर्षे कर्नाटक सरकार या भागातील ओढे, नाल्यांना पाणी सोडते. यामुळे अनेक तलाव भरतात. पाणी साठवणूक होते. त्याचा फायदा तीसपेक्षा अधिक गावांना होतो. पण ही योजना शाश्वत नाही. उद्या त्यांना पाणी कमी पडले, तर ते आपल्यावर कशाला मेहेरबान होतील? त्यामुळे म्हैशाळ योजनेचे पाणी माडग्याळ, उमदी, संख या गावासह सर्व उर्वरित ४५ गावापर्यंत पोहोचावे ही या भागातील लोकांची मागणी आहे. निसर्गाची अवकृपा आणि राजकर्त्यांची युज अँड थ्रो ही वृत्ती यामुळे दुष्काळ काही हटला नाही. म्हणून तर पाण्यासाठी त्यांचा लढा सुरू…