प्रेमाची परीक्षा
सन १९९६.साहेबांची बदली सातारा जिल्ह्यात झाली होती. माण तालुक्यात पोलिस ठाण्याचा कार्यभार त्यांनी नुकताच स्वीकारला होता. गांव तस शांत होतं. क्वचित कधी काही घडलं तरी नुसत्या चर्चा वा मध्यस्थीने प्रश्न मिटत. प्रकरण हातघाईला येऊन मोठी दंगल होणं वगैरे प्रकार साहेब आल्यापासून तरी घडले नव्हते. वैयक्तिक कलह असं आणि इतकचं तिथल्या गुन्हयांचं स्वरुप होतं.त्यामुळे साहेब खुश होते. त्या दिवशी आणि पडलेली कामे उरकायची असल्याने ते लौकरच म्हणजे सकाळी सात वाजताच ठाण्यात आले होते. त्यांच्या मागोमाग एक वृद्ध गृहस्थही ठाण्यात आला. साधारणता ५०- ५५ दरम्यान वय असावं, चेहऱ्यावर चिंतेचं जाळं आणि डोळ्यांत पाणी आणून तो उभा होता. आत बोलावून साहेबांनी त्याला येण्याचं प्रयोजन विचारलं. म्हातारा उभ्या जागी थरथरू लागला. ‘साहेब… साहेब माझ्या पोराला कुणी तरी मारून टाकलंय हो, पार खेळच खलास केलाय त्याचा !’ म्हणताना प्रयासाने धरून ठेवलेला हुंदका त्याला आवरला नाही. साहेब गंभीर झाले. ‘कुठून आलात तुम्ही मामा ?’, त्यांनी त्या वृद्धाला विचारलं. ‘बनगरवाडीहून साहेब, शर्टाच्या बाहीला डोळे पुसत तो म्हणाला. साहेबांनी लगोलग जीप बाहेर काढायला सांगितलं आणि लगेचच सगळे बनगरवाडीला रवाना झाले.
म्हसवडपासून ८ किलोमीटर अंतरावरच ते गावं होतं. जीप गांवात आली. पहिल्याच वळणाला वळली. कोपऱ्यावरच त्या वृद्धाचं घर होतं. घरापासून आणखी एक वळण घेतल्यावर एक कच्चा रस्ता आणि त्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर ऊसाचा फड लागत होता. ऊस ओलांडून पलिकडे एका रिकाम्या जागेत त्या वृद्धाच्या मुलाचा मृतदेह पडला होता. बघ्यांची ही गर्दी जमली होती. अवघं अडीच हजार लोकवस्तीचं ते गांव. त्या वृद्धाच्या मुलाचा खून झाला म्हटल्यावर अख्खं गांवच लोटलं होतं. पोलिसांना पाहून गर्दी बाजूला झाली. पोलिस मृतदेहाजवळ पोहचले. मृतदेह बघून साहेब हादरलेच. अवघं १५-१६ वर्षाचं पोर होतं ते. अजून मिसरूडही धड फुटलं नव्हतं, अंगाने सशक्त आणि थोराड वाटत होता. पण त्याचं वय सोळा वर्षांपेक्षा खचितच जास्त नव्हतं. त्याच्या छातीवर, पोटावर, मानेवर आणि खांद्यावर, असे मिळून धारदार शस्त्राचे ६-७ वार झाले होते, तेवढ्यावर ते पोर संपलं
होतं. पोलिसांना सूचना देऊन साहेब बाजूला झाले. इतक्या निर्दयीपणानं त्या मुलाला मारण्यासारखं काय कारण असावं असा प्रश्न साहेबांना पडला होता. विचार करत-करतच ते त्या मुलाच्या घरात आले. त्याच्या घरी नुसता आकांत सुरु होता. बाहेरच्या ओसरीवरच घरातली पुरुष मंडळी, बसली होती. मुलाचे वडील आणि दोन भाऊ यांच्याबरोबर भावकीतली सारी जवळच बसून होती. साहेबांनी विचारलं तुमचं कुणाशी कट्टर शत्रुत्व वगैरे होतं का? जमिनिवरून किंवा आणखी काही कारणांवरून वाद वगैरे ? सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली. अलिकडे कुणाशी त्याचं भांडण झालं होतं का, तो कशा स्वभावाचा होता, काय करायचा? असं काही घडण्यामागं कारण काय असावं याचा अंदाज आहे का, असे एकामागोमाग भरपूर प्रश्न साहेबांनी त्यांना विचारले. पण सगळी उत्तरे नकारार्थीच आली. म्हणून साहेब उठले. उठता-उठता त्यांचं आतल्या खोलीकडे लक्ष गेलं.आत बायकांचा घोळका होता. घोळक्यामध्येच ऊर बडवून रडणारी त्या मुलाची आई दिसली. सकाळी ठाण्यात आलेला वृद्ध आणि त्याची आता समोर दिसणारी बायको यांची सांगड साहेबांनी घातली. त्या वृद्धाची बायको त्याच्यापेक्षा खूपच तरुण दिसत होती. आणखीही एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ते घर अगदी नुकतंच सारवल्यासारखं दिसत होतं, नव्हे ते नुकतंच सारवलं होतंच.त्यांना जाणवलेल्या अशा काही गोष्टीची नोंद करत ते बाहेर आले.
बाहेर आल्या-आल्या त्यांनी एक काम केलं, पटापट प्रत्येकी चार पोलिसांची एक टीम करून गांवात ठिकठिकाणी त्यांना माहिती काढण्यासाठी पाठवलं, स्वतः मात्र त्या घराबाहेरच थांबले. घरातला आकांत थोडा शमल्यासारखा वाटल्यावर ते पुन्हा घरात आले. मुलाच्या आईला काही प्रश्न विचारायचे आहेत, असं त्यांनी सांगितल्यावर घरातली सारीच मंडळी तिच्यासोबत सोप्यात आली. पदराला डोळे पुसत ती साहेबांसमोर आली. चेहरा अगदीच म्लान झाला होता. पुन्हा कुठल्याही क्षणी तिला रडू फुटेलसं वाटत होत. तिचा अंदाज घेत साहेबांनी आस्ते आस्ते विचारायला सुरवात केली. ‘वहिनी तुमचा मुलगा घरातून बाहेर कधी पडला?’ ‘काल संध्याकाळी साहेब. मला तीन मुलं. मोठा मुलगा नोकरीनिमित मुंबईला असतो. कालच तो आला. संध्याकाळी टी. व्ही, बघायला म्हणून तो घरातून बाहेर पडला. जेवायची वेळ झाल्यावर धाकट्याला मी त्याला बोलवून आणायला पाठवलं. त्यानंतर बऱ्याच वेळाने माझा मोठा मुलगा घरी आला. पण तो मात्र आलाच नाही. मला वाटलं मित्राच्या घरी टी. व्ही बघायला गेला असेल. मग झोपला असेल तिथंच.’ साहेबांनी त्या मुलाच्या मोठ्या भावाला विचारल्यावर तो म्हणाला ‘साहेब, मी जिथं टी व्ही. पहात बसलो होतो,तिथे तो आलाच नाही. भूक लागल्यावर मी माझा मीच घरी आलो. ‘गावात कुणा-कुणाच्या घरी टी. व्ही. आहे ? साहेबांनी विचारलं. ‘साहेब, आमचं गांव लहान, मोजून चार घरात टी. व्ही. आहे साहेब’ त्याचा मोठा भाऊ म्हणाला.एक घर तर या इथं समोरच आहे. तिथचे तो बऱ्याच वेळा जायचा टी. व्ही. पहायला.
साहेब सचिंत झाले. त्या मुलाचा खून होण्यासारखं एकही सबळ कारण पुढे येत नव्हतं. शिवाय त्याचा मृतदेह सापडल्यानंतर तासाभरातच अख्खं गांव त्याच्या घरी जमा झालं होतं. म्हणजे गांवात तरी त्याच्या कुटुंबाची प्रतिमा चांगली होती मग काय कारण घडलं असावं? एक मात्र होते. घरचा मुलगा रात्रभर घराबाहेर रहातो आणि घरातल्या एकाही व्यक्तीला ते खटकलं नव्हतं. हे साहेबांना पटत नव्हतं. त्याचं रात्रभर बाहेर राहणं, विशेष बाब नसल्याचे त्याच्या घरच्यांनी दाखवून दिलं होतं. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास कुणी
फारसं उत्सुक नसल्याचंही दिसत होतं. एव्हाना दुपार झाली होती. साहेब बाहेर आले. थोडं अंतर चालून ते आले आणि एका अतिउत्साही चेहऱ्याने त्यांना हटकलं. ‘काय साहेब,पाणीबिणी हवं का ?’
साहेबांनी त्याच्याकडे बघितल्यावर तो बावचळून, बोलणं आटपतं घेऊन नुसताच उभा राहिला. वय तिशीचं असावं.अंगावर बनियन आणि कमरेला टॉवेल गुंडाळून तो उभा होता. त्याचं घर आसपासच असावं. त्याने पाणी हवं का म्हणून विचारल्यावर साहेबांनी ‘हो’ म्हणून सांगितले. त्या मुलाच्या घरापासून एक वळण घेतलं की थोड्याच पुढे जाऊन त्याचं घर होतं.साहेब दारातच कट्ट्यावर पाणी पीत बसले होते. उन्हं डोक्यावर आली होती. त्यांनी चौकशीसाठी पाठवलेले पोलिस एक-एक करुन परत यायला लागले होते. खुनाचा हा प्रकार एक तर आत्यंतिक द्वेषापोटी, मग कारण कुठलंही असो, किंवा प्रेमसंबंधातून झाला असावा, असा साहेबांचा प्राथमिक कयास होता. त्यादृष्टीने काही माहिती मिळते का ते बघायला त्यांनी पोलिसांना पाठवलं होतं. ते बसले होते तिथेच पोलिस आले. खून झालेला मुलगा दहावीत शिकत होता. गांवापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वीरकरवाडीत तो सायकलने शाळेला जायचा.स्वभावाने अतिशय सरळमार्गी मुलगा होता, अशी माहिती पोलिसांनी आणली होती. त्याच्या कुटुंबियांबद्दलही गावात चांगलं मत होतं. पोरगं दहावीला होतं, म्हटल्यावर थोडाफार हूडपणा त्याने केला असेल , पण त्याला असं जिवानिशी मारण्याचं गांवकऱ्यांच्या मते कुठलंही कारण नव्हतं. माहिती घेताना आणखीही एक गोष्ट उघड झाली होती. गांवात गैरसंबंधांचे प्रकार खूप होते.
पण त्यावरून काय निष्कर्ष काढणार ?
तपासाला कुठून सुरवात करायची याबाबत अजून एकही दुवा सापडत नसल्याने साहेब खंतावले होते. तोवर साहेबांना पाणी आणून देणारा माणूस पुन्हा बाहेर आला, चेहरा हसतमुख होता आणि वाजवीपेक्षा तो जरा जास्तच फाजील वाटत होता.पोलिसांना पाहिलं की लोक चार हात लांबच राहतात, हा साहेबांचा नित्याचा अनुभव होता. हे पात्र निराळंच होतं.पोलिसांशी स्वतःहून बोलणारा माणूस बघून साहेबांना जरा आश्चर्यच वाटलं होतं. पण तो कसा होता, याच्याशी त्यांना घेणंदेणं नव्हतं. त्यांना माहिती हवी होती म्हणून मग त्यांनी त्याच्याशी बोलणं छेडलं. झटक्यात त्याने स्वतःचे नांव, कामधंदा वगैरेबाबतची इत्यंभूत माहिती पुरवली. आपला एक भाऊही मुंबईला पोलिस खात्यात असल्याचं त्यानं अभिमानानं सांगितलं. म्हणूनच आपण पोलिसांना मदत करायला सरसावलो हे आणि वर सांगितलं, साहेबांना हसू आलं.
साहेबांनी त्याला गांवाबाबतचीही बरीच माहिती विचारली. गांवात प्रामुख्याने धनगर समाजाची वस्ती होती, धनगरांचं गांव म्हणूनच बनगरवाडी ओळखली जायची. गांवात जितकी म्हणून घरं होती, त्यातील प्रत्येकी एक तरी पुरुष कोणत्या ना कोणत्या नोकरीच्यानिमिताने मुंबईला असायचा. वर्षात सणासुदीच्या निमित्ताने सगळे एकत्र यायचे.सढळ हाताने पैसा खर्च करायचे, मौजमजा करायचे आणि पुन्हा आपल्या मार्गी रवाना व्हायचे, असा त्या गांवचा रिवाज बनून गेला होता. वर्षभर पुरुष मंडळी बाहेरच रहात असल्याने भांडणतंट्यांचे प्रसंगच सहसा उद्भवत नसत. एकंदर एवढी माहिती त्या माणसाने अगदी न थांबता सांगितली. फाजील असला तरी साहेबांना त्या माणसाचा स्वभाव आवडला होता.खून झालेल्या मुलाचं नाव राजू होतं. साहेबांनी राजूबाबत त्याला छेडले. राजू तुमच्याकडे यायचा का कधी ?’ साहेबांनी त्याला विचारलं, तसा तो म्हणाला, ‘ हो साहेब,सारखा यायचा आमच्याकडे टीव्ही बघायला. त्याला टीव्ही बघायला खूप आवडायचं. म्हणून शाळा सुटली कि हा आलाच टीव्ही बघायला. बोलायचालायला पण फार चांगलं पोरगं होतं,तो म्हणाला. तोवर लांब राहूनच एका पोलिसाने साहेबांना खुणावले. साहेब उठले. शिवसेनेचा एक कार्यकर्ता होता. वयाने तोही १७-१८ वर्षांचाच होता. राजूचे आणि त्या कार्यकर्ता असलेल्या मुलाचं एकदा कडाक्याचं भांडणं झालं होतं. शिवाय शिवसेनेचा तो कार्यकर्ता चाकू बाळगून असायचा, अशी महत्वाची माहिती त्या पोलिसाने आणली होती. माहिती निश्चितच दिलासा देणारी होती. कलहाचं एक संभाव्य कारण तरी समोर आलं होतं.साहेबांनी त्या कार्यकर्त्याला गुपचूप पोलिस ठाण्यात नेण्याची सूचना त्या पोलिसाला केली.आणि ते पुन्हा त्या इसमाच्या घरात आले. नुकताच मिळालेला तपासाचा दुवा महत्वाचा होता. पण आणखी एक शंका साहेबांना सतावत होती. त्या पोराचं कुठे प्रेम प्रकरण वगैरे तरी नव्हतं ना ? त्यातूनच तर अनिष्ट घडलं नव्हतं ना? शंकेला फार काळ मनात थारा नको म्हणून साहेबांनी पोलिसांना त्याच्या घरी जाऊन त्याचं दफ्तर तपासायला पाठवलं, अर्ध्या तासातच ते परत आले. वह्या-पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह असं काहीच आढळलं नव्हतं. फक्त एका वहीत शेवटचा पानावर एक मोठा बदाम कोरलेला होता. आणि त्यात ‘एस’ हे इंग्रजी आद्याक्षरही कोरण्यात येऊन बाण वगैरे काढला होता.
साहेबांनी भुवया वक्र केल्या. ‘अच्छा म्हणजे ‘दिल का मामला’ ही होता तर. दुपारचा दीड वाजला होता. सकाळपासून आशादायक असं काही पदरात पडलं नसलं तरी अगदी उठता-उठता बरंच काही हाती पडलं होतं. आता तपास त्वरेने करायचा साहेबांनी निश्चित केलं. साहेबांनी निरोप घ्यायचा म्हणून त्या इसमाला हाक मारली. आतल्य खोलीतून तो बाहेर येत होता. अगदी सहजच साहेबांचं लक्ष आतल्या खोलीत गेल बाहेरच्या खोलीपासून केवळ एक पार्टीशनवजा भिंत उभारून आतली खोली वेगळी करण्यात आली होती. दार नव्हतंच त्यामुळे आतल्या खोलीत कोपऱ्यात असलेली न्हाणी दिसत होती. न्हाणीला लागूनच भिंतीवर एक आडवी काठी बांधली होती. त्यावर कपडे वाळत घातले होते. कपड्यांत असलेल्या एका साडीच्या काठाला रक्ताचे खूपसे पुसट डाग पडल्याचे दिसत होते. साहेब कोड्यात पडले. मनातली खळबळ वरकरणी न दर्शवता त्याने तांब्यातून आणलेलं पाणी ते घटाघटा प्याले आणि बाहेर आले.
बाहेर येताच साहेबांनी पोलिसांना काही सूचना देऊन पुन्हा त्या मुलाच्या घरी पाठवलं.तो मुलगा जिथे शिकायला होता त्या शाळेतही पोलिसांनी चौकशी केली.
साहेब पुन्हा येऊन त्या इसमाच्या घरासमोर असलेल्या कट्ट्यावर बसले.तपासाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. पण साहेब मात्र अस्वस्थ होते. रक्ताचे डाग असलेली ती साडी त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. अर्थात म्हणून त्या साडीवरून निष्कर्ष काढणं काही शहाणपणाचं नव्हतं. पुन्हा त्या घरात जावं की नको या द्विधेत साहेब बाहेरच बसून होते. एवढ्यात त्या मुलाच्या घरी गेलेले पोलिस परत येताना दिसले. मुलाच्या प्रेम प्रकरणाबाबत वगैरे काही समजलं का?’, साहेबांनी विचारलं. नाही साहेब. त्याच्या घरच्यांना त्याबाबत फारशी कल्पना नाही. तो सहसा कुणाकडे जायचा नाही. पण तो या घरात मात्र दिवसातला बराच वेळ असायचा,’ पोलिसांनी त्या इसमाच्या घराकडेच अंगुलीनिर्देश करून सांगितलं. साहेबांना अगदी तत्परतेने माहिती पुरवणारा तो इसम महिन्यातून पंधरा दिवस तरी मुंबईलाच असायचा आणि त्याच्या गैरहजेरीत तो मुलगा त्याच्या घरच्यांना सोबत म्हणून रात्री झोपायला त्या इसमाच्या घरीच असायचा. दोन्ही घरच्या लोकांचे संबंधही घनिष्ट होते, अशी माहितीही पोलिसांनी सांगितली.
मग मात्र साहेब चमकले. ही माहिती त्या इसमाने त्यांच्याशी बोलताना वगळली होती. उठून ते सरळ आत गेले. त्या इसमाला त्यांनी विचारलं ‘तुमच्या घरी कोण-कोण असतं ?’ ‘मी, माझी बायको आणि दोन मुलं साहेब,’ तो उत्तरला. त्याची दोन मुले तर तिथेच केव्हापासून खेळत होती. पण बायको मात्र कुठे दिसत नव्हती. साहेबांनी त्याला विचारलं. ‘बायको कुठे गेली तुमची ?’ ‘रानात गेली आहे साहेब, म्हशी चरवायला. त्याने न बिचकता उत्तर दिलं. ‘अच्छा’ साहेब मनाशीच म्हणाले. इथं नक्कीच काहीतरी गोम आहे. असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. पण संशय आल्याचं त्या इसमाला लगेचच दाखवून देऊन चालणार नव्हतं. वागण्यात एकदम ढिलाई आणत, त्या इसमाकडे वळून ते म्हणाले, इथे खूप तणाव आहे. आम्हांला जरा मदत करा. गांवात थांबून तुमच्याकडून माहिती घेणं काही खरं नव्हे. तुम्ही पोलिसांसोबत ठाण्यात जा. तिथं त्यांना आरामात हवी ती माहिती द्या. ‘हो चालेल’, तो मान डोलावत म्हणाला.
त्याला पोलिस ठाण्यात पाठवून साहेब मात्र तिथेच थांबले. सोबत काही पोलिसही होते. तोवर शिवसेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्याच्या आणि त्याच्या शाळेत केलेल्या चौकशीची माहिती घेऊन पोलिस आला. दखल घेण्यासारखं त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. शवविच्छेदनानंतर त्या मुलाचे अंत्यसंस्कार आटोपूनही गांवकरी गांवात परत आले. पण त्या इसमाच्या पत्नीचा अजून पता नव्हता. सायंकाळचे पाच वाजत आले आणि दुरून म्हशी घेऊन येताना ती बाई दिसली. साधारण पंचविशीची असावी. दिसायला अतिशय सुंदर होती. घराजवळ येताच पोलिसांना पाहून तिने न पाहिल्यासारखं कलं. म्हशींना गोठ्यात बांधून ती सरळ घरात गेली. साहेबही लगोलग आत गेले. त्यांनी तिच्याकडे पाणी मागितलं तशी ती फटकन् म्हणाली – ‘साहेब, घरात माझा नवरा नाही. तुम्ही नंतर या.’ ‘अहो पण पाणी द्यायला काय हरकत आहे ?’ साहेबांनी विचारलं. ती पाणी घेऊन आली तसं साहेबांनी मनाशी काही तरी योजूनच प्रश्न विचारायला सुरुवात केली. ‘तुमच्या शेजारच्या राजूचा खून झाला’, तुम्ही नाही गेलात का बघायला ?’ साहेबांनी विचारलं. ‘कोण राजू ?’
चेहऱ्यावरची रेषही न हलवता तिने विचारलं, तसा साहेबांचा संशय आणखी बळावला. ” तुम्ही राजूला ओळखत नाही? ” साहेबांनी विचारलं. ‘नाही’ ती ठामपणे म्हणाली. साहेबांचा आवाज एकाएकी चढला. ‘बाई – शहाणपणा नको. मी जे विचारतोय त्याची सरळ उत्तरं द्या. या वाळत घातलेल्या साडीवर रक्ताचे कसले डाग आहेत ?’ त्यांनी दरडावून विचारलं. त्यांचा प्रश्न परतवून लावत ती ताठ्याने म्हणाली- ‘साहेब, उगाच नसते प्रश्न विचारू नका. भान आहे का काय विचारता त्याचं ?’ आता मात्र साहेबांचा तोल गेला.
पोलिसांना हाक मारून त्यांनी तिला सरळ हातकड्या लगावल्या. म्हणाले – ‘तुझ्या नवऱ्यानं सगळं सांगितलंय आम्हांला, बघू कसं सांगत नाहीस ते’..तरीही मग्रूरपणाने मानेला हिसडा देऊन ती म्हणाली- ‘बघू की चला.’ तिला पोलिसांनी ठाण्यात आणलं. ठाण्यात येताच केबीनमध्ये तिला बसवून साहेबांनी एका पोलिसाला बोलावून कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर पलिकडून तिच्या नवऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आणि पुरुषाच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. आवाज वाढू लागला तशी ती बेचैन झाली. ‘साहेब मरेल की माझा नवरा अशा मारण्यानं, मी सांगते सगळं पण मारायचं थांबवा.’ पलिकडून भिंतीवर, लाकडी खोक्यावर मारण्यात येणारे फटके थांबले. मुद्दाम काढण्यात आलेला पोलिसांचाच किंचाळण्याचा आवाजही थांबला आणि ती आपोआप बोलू लागली.
‘साहेब, माझा नवरा कामानिमित बाहेर मुंबईला जायचा तेव्हा रात्री सोबत म्हणून राजू आमच्या घरी यायला लागला. एका बेसावध क्षणी मीच त्याला जाळ्यांत ओढलं आणि आमचे संबंध जुळले. पण नंतर नंतर नवऱ्याला संशय येऊ लागला. कारण राजू सदान् कदा आमच्या घरीच घुटमळायचा. मी त्याला समजावलं देखील. पण तो ऐकायचा नाही. एका सकाळी नवऱ्याने दोघांनाही शेतात रंगेहाथ पकडलं आणि त्याने आकांडतांडव केलं. माझा संसारच निखाऱ्यावर आला होता. नवरा माझ्या आणि माझ्या दोन मुलांच्या जीवावर उठला होता. ‘माझ्यावर प्रेम असेल तर राजूला आजच संपव नाही तर मी तुम्हांला संपवीन,’ अशी धमकी त्याने दिली. ‘साहेब, विचार करायला वेळ नव्हता. एकट्या राजूसाठी आम्ही सगळ्यांनी बरबाद होण्यापेक्षा त्यालाच संपवायचा पर्याय मी निवडला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला भेटले. ‘नवऱ्याला संशय आला असल्याने आजपासून तू मला संध्याकाळी भेटत जा असं सांगितलं.’ त्या दिवशी संध्याकाळी सातच्या दरम्यान तो दारात उभा होता. बाहेर पडता पडता मी त्याला बॅटरीचा झोत टाकून खुणावलं. तो माझ्या मागोमाग आलाच. ऊसाचा फड पार करून पुढे असलेल्या मोकळ्या जागेत आम्ही आलो. तो खाली बसला अन् क्षणभर विसावला. तितक्यात साडीत लपवलेला चाकू मी बाहेर काढला. तो बेसावध होता. धैर्य एकवटलं आणि तीच संधी साधून मी त्याच्यावर सपकन् वार केला. तो बसल्याजागी खाली पडला. पण काय घडतंय ते लक्षात येताच उठून पळू लागला. पण त्याचा हात पकडून मी बेभान होऊन वार करत गेले. तोवर तिथेच लपलेला माझा नवराही बाहेर आला. त्याने त्याला पकडलं. मी आणखी एक वार केला. अर्धमेला झालेला तो क्षणात खाली कोसळला. तो मेलाय याची खात्री करून आम्ही शेतात गेलो. रक्ताने माखलेली साडी धुतली. रात्र सरेपर्यंत थांबलो आणि पहाटे घरी आलो…..!’ सगळं सांगून झाल्यावर ती थांबली. साहेब, हतबुद्ध होऊन पहात राहिले.’
खून तिच्या नवऱ्यानं केला असावा, असा त्यांचा अंदाज होता. पण तिचंच हे कृत्य आहे म्हटल्यावर साहेब हादरले होते. परिस्थितीमुळे गुन्हे करण्यास प्रवृत्त होणाऱ्या स्त्रियाही त्यांनी पाहिल्या होत्या. पण स्वतःच्या विषयलालसेपोटी एका कोवळ्या जीवाला वेठीला धरणारी आणि प्राणांवर बेतल्यावर मात्र त्याला निर्दयतेने संपवणारी स्त्री ते प्रथमच पहात होते. खुनाचा तपास त्यांनी अवघ्या बारा तासांत लावला होता. खात्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती. पण साहेब मात्र विषण्ण होते. सुन्नपणे ते खुर्चीत येऊन बसले.
स्त्रीची महानता सांगणाऱ्या बहुतशा व्याख्या त्यांनी साहित्यात वाचल्या होत्या. पुष्कळ प्रसंगातून त्यांना अशा महानतेची प्रचितीही आली होती. त्यामुळे ‘स्त्रीमुळेच रूढ अर्थाने मानव आणि पर्यायाने समाजाची घडण होते.’ अखंड सात्विकतेचं तीच बीज असते असं ते मानत आले होते. पण या स्त्रीने त्यांच्या सगळ्या निष्ठांना सुरूंग लावला होता. स्त्री जातीला कलंक, क्रूर, निर्दयी…. अशा कुठल्याच व्याख्यांमध्ये ती बसत नव्हती. तिला केवळ ‘अमानवी’ म्हटलं जाऊ शकत होतं.
(तपास अधिकारी : संजय ताठे, तत्कालीन फौजदार म्हसवड पोलिस ठाणे)
——समाप्त——