भारताला यंदा पहिल्यांदाच महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभली आहे

आगामी ‘एएफसी’ आशियाई चषक स्पर्धेमुळे भारतात महिला फुटबॉलच्या प्रसाराला गती मिळेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यात हा खेळ पोहोचेल, असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार आशालता देवीने व्यक्त केला.
भारताला यंदा पहिल्यांदाच महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभली आहे. २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेचे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे रंगणार आहेत. आशियाई स्पर्धेच्या आयोजनामुळे देशातील युवा पिढीला फुटबॉल खेळण्याची प्रेरणा मिळेल, असे आशालताला वाटते.
‘‘या स्पर्धेचा भारतातील महिला फुटबॉलवर सकारात्मक प्रभाव पडेल. भारताने याआधी इतक्या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. आपल्या देशात अजूनही अनेकांना महिला फुटबॉलविषयी फारशी माहिती नाही. मात्र, आशियाई स्पर्धेमुळे फुटबॉल हा खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि महिला फुटबॉलच्या प्रसाराला गती मिळेल अशी माझी धारणा आहे,’’ असे आशालता म्हणाली.
