पक्षविस्तारासाठी मंत्रीपदाची ताकद आवश्यकच, कार्यकर्त्यांची मागणी
राजकीय भूकंपाचा एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेली पक्षाची जबाबदारी कायम ठेवत मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे समजते. पण गेल्या सात वर्षात राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पक्षाचा केलेला विस्तार, महसूल, अर्थ, सहकार अशा महत्त्वाच्या खात्याचे यशस्वीपणे सांभाळलेले मंत्रीपद, मराठा आंदोलनाह अनेक प्रश्न हाताळताना त्यांनी दाखवलेले कौशल्य आणि मित्र पक्षांशी असलेले सौदार्हपूर्ण संबंध, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी लवकरच होत असलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी विविध पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांची सत्ता आल्यानंतर अचानक फडणवीस यांच्या ऐवजी शिंदे मुख्यमंत्री झाले. आपण सत्तेत सहभागी होणार नाही, आपल्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री करावे अशी विनंती फडणवीस यांनी पक्षनेतृत्वाकडे केली होती. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. पण दोन तासात अचानक झालेल्या राजकीय घडामोडीतून फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर विधानसभा सभापती पदासाठी एखाद्या सीनियर आमदाराची निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या तीन राजकीय भूकंपाच्या पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तारातही अनेक धक्के देण्याच्या मनस्थितीत भाजपचे नेते असल्याचे समजते. याचाच एक भाग म्हणून पक्षातील काही बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून न घेता पक्षविस्ताराचे काम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचे नाव असल्याचे समजते. पण पक्षाच्या विस्तारासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी पक्षातूनच जोरदार पाठपुरावा केला जात आहे.
चंद्रकांत पाटील हे भाजपमधील मोठे नाव आहे. त्यांचे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी अशी महत्त्वपूर्ण खाती यशस्वीपणे सांभाळली. पक्ष सांगेल ती सर्व जबाबदारी आनंदाने स्वीकारणारे नेते म्ह्णून त्यांची ओळख आहे. सत्ता काळात पक्षाच्या विस्तारात त्यांना वाटा अतिशय मोलाचा आहे. विशेषता दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी कमळ फुलविला. दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या हातात कमळ देण्यात त्यांचा वाटा आहे. खासदार संजय पाटील, उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे यांच्यासह अनेक नेत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला. काही साखर कारखाने पक्षाच्या ताब्यात आली.
मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न त्यांनी अतिशय सांमजस्याने हाताळला. मंत्रीगट समितीचे ते अध्यक्ष होते. न्यायालयात तो टिकावा यासाठी प्रयत्न केले. शिवसेनेसह रासप, स्वाभिमानी, रयत क्रांती, शिवसंग्राम अशा मित्रपक्षांना सोबत घेत त्यांनी युती अधिक भक्कम केली. ज्या पश्चिम महाराष्ट्रात हा पक्ष अतिशय नगण्य होता, तेथे सत्तास्थानापर्यंत तो पोहोचविण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. पक्षाला चेहरा दिला. त्यातून केवळ विधान परिषदेत आमदार म्हणून त्यांची असलेली ओळख काही वर्षातच राज्याचे नेते म्हणून झाली. त्यामुळे राज्यात कमळ फुलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे पक्षाला मान्यच करावे लागेल. भाजपला अधिक लोकाभिमुख चेहरा मिळवून देण्यासाठी दादांचे मोठे योगदान आहे.
चंद्रकांत पाटील यांनी भाजप साठी दिलेले योगदान, केलेला त्याग, घेतलेले कष्ट, पक्षावरची निष्ठा, पक्षादेश अंतिम मानून- सर्वस्व पणाला लावून केलेलं काम यामुळेच नेतृत्वाने त्यांना अनेक स्तरावर महत्वाची जबाबदारी दिली, आणि त्यांनी ती व्यवस्थीत सांभाळली. युती सरकारच्या काळातही त्यांनी नेहमीच महत्वाचा रोल बजावला. कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी, पेच प्रसंगी एखाद्या राजदूतासारखी त्यांनी भूमिका बजावली . त्यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे, सलोख्याचे आणि विश्वासाचे संबंध त्यासाठी उपयोगी पडले. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही पाटील यांचे अत्यंत विश्वासाचे, स्नेहाचे नाते आहे. बदललेल्या राजकीय समीकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंड देण्यासाठी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
आगामी काळात महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवून पक्ष विस्तारासाठी त्यांचा उपयोग करून घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष पद फडणवीस घेणार होते, त्यांनी तसे सुतवाचीही केले होते, पण अचानक त्यांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने पाटील यांच्याकडील पद आता कायम राहणार आहे. पाटील यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी आग्रह धरला तर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नक्की होऊ शकेल. पण पक्ष देईल ती जबाबदारी आपण घेऊ, आपण तर कोरे पाकीट आहे, पाकिटावर जे नाव लिहील तिथे आपण पोहोचू अशी भूमिका ते सातत्याने मांडत असतात. यामुळे आता पक्ष त्यांच्या पाकिटावर नवीन पत्ता म्हणून मंत्रीपद लिहिणार की प्रदेशाध्यक्ष पद कायम ठेवणार याची आता उत्सुकता वाढलेली आहे.
पाटील यांच्याकडे यापूर्वी मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद दोन्ही होते. पक्ष विस्तारासाठी प्रदेशाध्यक्षपदा बरोबरच मंत्रीपदाची ताकद असणे आवश्यक आहे. तसा विचार पक्षाने केल्यास त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नक्की होऊ शकतो आणि दोन्हीही पदे त्यांना मिळू शकतात. मंत्रीपद मिळावे अशीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
