Party with a difference… Make a difference…Be a difference…
आजकाल सतत हे कानावर पडत राहतं.. वाचण्यात येत राहतं. प्रत्येक दिलफेक वाक्याचा एक वेगळाच स्वॅग असतो. त्याचा ट्रेंड बनतो.
पण
Be a DIFFERENCE… अर्थात समाजात अथवा सभोवती बदल घडवायचा तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते.
आज जागतिक महिला दिन.
महिलांनी हा एकच दिवस स्वतःचा म्हणून मिरवायचं नाही… असं असलं तरी
या दिवसाचं औचित्य म्हणून
महिलांच्या एकूण कर्तृत्व आणि व्यक्तित्वाबाबत आपण बोलतोच.
आजचं या निमित्ताने चर्चेत आणलेलं व्यक्तित्व आहे.. डॉक्टर सुप्रिया माने यांचं.
पेशा वैद्यकीय सेवेचा. त्यात गेले एक तपाहून जास्त काळ त्या कार्यरत आहेत. मोठा मित्र आणि स्नेहीजन परिवार सांभाळत सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने स्वतःचे एक पाऊल पुढे टाकले आहे.
महिलांनी एकंदर व्यक्तिमत्व विकासात शरीर
सुदृढ आणि सक्षम करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे असं सुंदर उदाहरण त्यांनी स्वतःच्या कृतितून महिलांसमोर घालून दिलं आहे.
ट्रेकिंगच्या मोहिमेत, मॅरेथॉन आणि त्यासम स्पर्धा आणि उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवणाऱ्या डॉक्टर सुप्रिया यांनी अलीकडेच एक पाऊल पुढे जात इचलकरंजी ते पंढरपूर हे अंतर सायकलने दहा तासात पूर्ण केलं. विठ्ठल दर्शनाचे अवीट गोड उद्दिष्ट ही साधले.
या मोहिमेसाठी त्या इचलकरंजी च्या रिंगण फौंडेशन च्या उपक्रमात सचिन खोंद्रे आणि इतर सदस्यांसह सहभागी झाल्या.
या मोहिमेचा तपशील मोठा आहे. पण त्यातून डॉक्टर सुप्रिया यांनी महिलांना आरोग्य आणि सक्षमतेच्या दृष्टीने जागरूक राहण्याचं उदाहरण स्वतःच्या कृतीतून दिलं आहे.

